अदभुत पक्षी विश्व
आपण नेहमी बघतो की शालेय जीवनात जडलेला छंद किंवा आवड ही आयुष्यभर साथ करते. प्राणिमात्रांवर प्रेम तसेच निसर्गाबद्दल असणारे कुतुहल उपजतच असते. त्यातूनच पक्षी निरीक्षण हा एक आनंददायी छंद उगम पावतो.
पुढील धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण फारच कमी येतात. तरी पक्षीनिरीक्षण, परसदारी, बागेत, शाळा-कॉलेज किंवा कचेरीत जाताना देखील करता येते. या निरीक्षणांतून पक्षांच्या विविध जाती, आवाज, गाणी, रंग हावभाव आपल्याला रोमांचित करीत असतात. त्या द्वारें या बहुरंगी/बहुढंगी निसर्गाची ओळख हळुवार पणें होत असते.
पक्षी निरीक्षण तसेच पक्षी अभ्यासाचे सुरूवातीचे दिवस एखाद्या निपुण पक्षी अभ्यासकाच्या सोबतीने केल्यास वर्षा-दोन वर्षात शंभराच्या आसपास पक्षांच्या प्रजातींची जान पहेचान झालेली असते. या टप्प्यावर पक्षांविषयी अधिक माहिती जाणून घ्यावयाची ओढ लागते. पक्षी कसे वागतात, कसे गातात, त्यांची घरटी, प्रियाराधन, विणीचा हंगाम, पिलांचे संगोपन तसेच त्यांच्या अनाकलनीय आणि चमत्कारिक स्थलांतराविषयी माहिती एकत्रितपणें कुठे मिळेल याचा शोध सुरू होतो.
अशा अभ्यासकांसाठी डॉ. प्रतिभा सहस्त्रबुध्दे आणि डॉ. जयंत सहस्त्रबुध्दे या बुध्दीप्रधान लेखक द्वयींनी अद्भुत पक्षी विश्र्व हे छोटेखानी पुस्तक लिहिले. नागपुरातील नचिकेत या दर्जेदार व माहितीपर पुस्तके प्रकाशित करणारी परंपरा जोपासणाऱ्या प्रकाशन संस्थेचे श्री. अनिल सांबरे यांनी हे मराठीतून लिहिलेले पुस्तक पक्षी अभ्यासकांकरिता उपलब्ध करून दिले आहे.
आपला देश विविध भाषांनी संपन्न आणि समृध्द आहे. असे असून देखील कुठल्याही विज्ञान शास्त्राची ओळख आपल्याला इंग्रजी सारख्या परकीय भाषेतून होत असते. पक्षी निरीक्षण हा छंद त्याबद्दल जागरूकता तसेच पक्षी अभ्यासाची ओढ आज देशात/गाव खेड्यात आबालवृध्द तसेच विविध आर्थिक स्तरातील जन सामान्यांपर्यंत लागलेली दिसते. इंग्रजी भाषेचे सखोल ज्ञान यातील सगळ्यांनाच नाही. म्हणूनच अद्भुत पक्षी विश्र्व हे मराठी भाषेतील पक्षी विज्ञानावरील पुस्तक जनसामान्य शैक्षणिक विद्यार्थी तसेच पक्षी अभ्यासकांसाठी मौल्यवान आहे.
पक्षी अभ्यासाचा पाया भारतात डॉ. टी.सी. जॉर्डन तसेच श्री. ऍलन हूम या इंग्रजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घातला. पुढे जागतिक कीर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ कै.डॉ. सलीम अली यांनी यांनी भारतीय पक्षी-जगतावर संशोधन करून भारतीय उपखंडातील पक्षांची माहिती 10 खंडात प्रसिध्द केली. डॉ. सहस्त्रबुध्दे लेखक द्वयींनी अद्भुत पक्षी विश्र्व या पुस्तकात कै.डॉ. सलीम अलींच्या पक्षी खंडाचा उपयोग केला आहे. डॉ. सलीम अली म्हणत की केवळ पक्षी निरीक्षणाची चर्चा संवर्धन एवढ्यावरच न थांबता पक्षीशास्त्राचा ;व्तदपजीवसवहलद्ध अभ्यास करायला हवा.
डॉ.सौ. प्रतिभा सहस्त्रबुध्दे आणि डॉ. जयंत सहस्त्रबुध्दे यांनी प्राणीशास्त्र या विषयात नागपूरच्या सेंट फ्रांसिस डी सेल्स (एस्.एफ.एस्.) या कॉलेजात जवळजवळ 40 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. सर आणि मॅडम अध्यापन काळात विद्यार्थ्यांना प्रिय होते. त्यांचा पीएच्डी संशोधनाचा विषय होता `वटवाघूळ’. त्यांनी आयुष्यभर वटवाघुळांवर देशविदेशात शोधनिबंध सादर केले, अनेक मानसन्मान मिळविले पाठ्यपुस्तके लिहीली, भाषणे दिली, पूर्णवेळ त्यानी प्राणीशास्त्र हा जिव्हाळ्याचा विषय शिकविण्याचे व्रत जोपासले. तरी, पक्ष्यांसारखा दोन पायांचा, पंख असलेला, इवलासा रंगबेरंगी प्राणी त्यांना मात्र आकर्षित करीतच होता; शेवटी, निवृत्तीनंतर त्यांनी या विषयावर सखोल अभ्यास करून, शैक्षणिक विद्यार्थी तसेच पक्षीनिरीक्षकांकरीता अद्भुत पक्षी विश्र्व हे पुस्तक लिहीले.
पक्षी शास्त्रातील प्रत्येक अंगाला या पुस्तकात स्पर्श केलेला आहे. पक्षांचे शरीरशास्त्र, त्यांची जीवन शैली, पक्षी उड्डाणाबद्दल तसेच स्थलांतराबद्दल सविस्तर चर्चा, देशोदेशीचे पक्षी, तसेच राज्य पक्षांची सूचि या पुस्तकात दिली आहे. दुर्मिळ पक्षी, त्यांचे संवर्धन तथा संरक्षणाबद्दल त्याच प्रमाणे पक्षांचे मानवाच्या आयुष्यात असलेले स्थान याबद्दल विस्तृत माहिती या पुस्तकात बघावयास मिळते.
पक्षांचे कूळ/उपजाती, त्यांची सुधारित शास्त्रीय नावे, तसेच पक्षी निरीक्षणाबद्दल थोडक्यात माहिती, महाराष्ट्रातील पक्षीमित्र चळवळींचा वृत्तांत, महाराष्ट्रातील पक्षी अधिवास आणि पक्षी अभयारण्याबद्दल अधिक माहिती आपण पुढच्या आवृत्तीत बघू अशी माफक अपेक्षा.
- डॉ. अनिल पिंपळापुरे
(भ्र.) 9881713466
नचिकेत प्रकाशन
लेखिका : डॊ. प्रतिभा सहस्त्रबुध्दे
पृष्ठ : १४१, किंमत : रु.१४०/-
वनस्पती विश्र्वाची आगळीवेगळी ओळख करून देणारे
वनस्पतींची अद्भुत कार्यशैली
नातवंडांच्या कुतुहल मिश्रित चौकस उत्साहामुळे लिहिले गेलेले, पण त्यामुळे अनेकांच्या कुतुहलांचे समाधानात रूपांतर करणारे असे हे पुस्तक!
निसर्गातील प्राणी, पक्षी यांचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व सामान्य गृहिणी देखील हल्ली बरीच माहिती गोळा करतात. वेळोवेळी दैनिकातूनही ती वाचायला मिळते. परंतु वनस्पतींबद्दल इतकी सखोलवर माहिती आणि तिही साध्या सरळ मराठी भाषेत आणि सचित्र, क्वचितच दिसेल.
आपण झाड मेलं म्हणतो, म्हणजे ते सजीव आहे. जन्म, पोषण, वाढ, प्रजनन हे सर्व आलं. मुळात वनस्पतींमध्ये किती प्रकार आहेत? झाड, वेली हे प्रकार सर्वांना माहीत असतंच, पण मूळ, खोड,पानं नसलेल्या वनस्पतींबद्दल क्वचित लोकांनाच (विषयाचे अभ्यासक सोडून) माहिती असेत. इतर सजीवांप्रमाणे वनस्पतींनाही पाणी आवश्यक आहे. वनस्पती पाणी आणि खनिज यांचं शोषण कशा करतात? त्यातही दोन प्रकार कसे? एक क्रियाशील शोषण तर दुसरं निष्क्रिय शोषण. मग ते कशाप्रकारे होते? वायू तर हवेतून मिळतो पण खनिज क्षार मुळांद्वारे शोषले जातात. मग ते कार्य कशाप्रकारे होते, हे सविस्तर कळते.
पाणी आणि खनिजांचे वनस्पतींच्या मुळांपासून पानांपर्यंत वहन म्हणजे रसारोहण. ते कसे होते? मुळापासून वरपर्यंत पाणी कसे चढते? दुपारी रात्रीपेक्षा झाडांना पाण्याची गरज जास्त असते तेव्हा रसारोहण कसे होते? झाडातही जलवाहिन्या असतात आणि त्यांचे कार्य कसे चालते, हे पण कळते. पहाटेच्या वेळी गवतावर (दव) पाण्याचे थेंब दिसतात ते पाणी कुठून येते? वातावरणातील प्रकाश, ऋतुमानानुसार उष्णता व लहान मोठा दिवस ही सर्व परिस्थिती रसारोहणास कशी कारणीभूत होते, हे सविस्तर कळून येते.
झाडाद्वारे होणारं प्रकाश संश्लेषण आणि अन्नवहन ह्या प्रकरणात झाडं सूर्य प्रकाशाची मदत कशी घेतात? स्वत:च स्वत:साठी अन्नघटक आणि जीवनसत्व ह्याची निर्मिती कशी करतात, हे वाचायला मिळते. शिवाय वैशिष्ठ्यपूर्ण पोषण घेणारी झाडं कोणती? काही झाडं दुसऱ्या झाडांपासून, कचरा, कुजणाऱ्या कचऱ्यापासून किंवा काही झाडं परपोषी म्हणजे इतर सजीवांपासून स्वत:चे पोषण कसे करतात?
दुसऱ्या झाडांपासून पोषण मिळविणारी अमरवेल आपल्याला माहीत आहे, पण कार्य कसे होते ते येथे वाचायला मिळते. पण अशी काही फुलझाडेही आहेत हे वाचून आपण अचंबित होतो. एक मीटर व्यास असलेले रॅफ्लेशियाच्या फुलाबद्दलची माहिती आपल्या वाचनात कधीच आली नाही. जगभरातील लोक ते बघण्यासाठी इंडोनेशियात गर्दी करतात. त्याचा पोशिंदा वेगळा. ह्या फुलाच्या कळीला उमलायलाच 9 महिने लागतात. जणु मानवाचा जन्म! त्याच वर्गातील तारापुष्प. फक्त ह्या झाडाचे पोषण दुसऱ्या झाडाच्या मूळापासून होते. आपल्याकडे ज्वारीच्या मुळांवर तण दिसते. वेळीच त्यांना उपटून फेकावे लागते. ह्याच प्रकारचे आपल्याकडे दिसणारे झाड म्हणजे चंदन! खटकते नां?
सेंद्रिय कचऱ्यापासून पूर्ण पोषण मिळविणारी पण फुलझाडं असतात. स्वत: अन्ननिर्मिती करीत नाहीत. मांसाहारी वनस्पती! स्वत:च्या शरीरातील कमतरता कीटकं, अळ्या, प्राण्यांपासून मिळवितात? कशी मिळवितात, तेच वाचण्यासारखे आहे. पाण्यातील कीटकांपासून पोषण करणाऱ्या आणि पाण्यातच वाढणाऱ्या अशाही वनस्पती आहेत. झाडांची मानवप्राण्यांप्रमाणे श्र्वसनक्रियाही सुरू असते आणि आपल्याप्रमाणेच तीही 24 तास सुरू असते. हे सर्व मूळातून वाचणेच उत्तम!
वनस्पतींची वाढ म्हणजेच उंची, जाडी, आकार वाढणं आणि विकास म्हणजे बी रूजणं, शाखा, फुलं, फळं, येण वगैरे, बी पेरणं मग, अंकूर फुटणं, मग रोपटं तयार होणं, फांद्या फुटणं, मोहोर, कळ्या, फुलं, फळं व पुन: बीज ह्या सर्व पायऱ्या आहेत.
झाडातही अल्पायू, एकदाच फुलणारी (सिझन, तेरडा) मोसमी, दीर्घायू, एकदा लावल्यावर अनेक वर्ष फुलं देणारी असे प्रकार तसेच फळातही. ऋतुमानानुसार फुलं व फळं. प्रकाशकिरणांशी त्यांचा संबंध. त्यात कृत्रिम रीत्या प्रकाशात बदल केल्यास पडलेला फरक. प्रकाशाच्या तीव्रतेवर व कालावधीवर, उदा. मोठा दिवस, लहान दिवस असल्यास फुलं उगवण्यात पडणारा फरक. कधी कधी आपल्यालाही अनुभव येतोच की, जागा बदलल्यावर झाडं वाढतात किंवा मरतात. कधी झाडांची एकच फांदी सुकते, ती कां? झाडांच्या पेशी, ग्रंथी, मकरंद देणाऱ्या ग्रंथी अशी अनेक प्रकारची माहिती व ज्ञान ह्या पुस्तकातून वाचायला मिळते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व माहिती सचित्र असल्यामुळे खुपच आनंद मिळतो. चित्र खुप स्पष्ट आणि प्रत्येक घटकाचे नाव खुणा व्यवस्थित असल्यामुळे संभ्रमाला जागाचं नाही.
केवळ विद्यार्थीच नव्हेत तर शिक्षक, गृहस्थांसाठीही विशेषत: बाग (छोटीशी असेना कां) आवडणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी हे पुस्तक आवश्यक आहे. अगदी आबाल वृद्धांसाठी देखील. बालवाडीपासूनच्या मुलांनाही त्यांच्या कुवतीनुसार ज्ञान देता येईल. सप्रयोग देता येऊ शकेल. अशा शाळेतील शिक्षकांसाठीही उपयुक्त आहेच पण काही चांगलं वाचल्याचे समाधान मिळवण्यासाठीही उत्तम आहे. अशा या पुस्तकाचे लेखक आहेत, डॉ. किशोर मुकुंद नेने आणि आवर्जून विज्ञान व माहितीपर पुस्तके प्रकाशित करणाऱ्या नागपूरच्या नचिकेत प्रकाशनातर्फे हे उत्तम पुस्तक प्रकाशित झाले आहे. समर्पक मुखपृष्ठ आणि देखणी मांडणी यामुळे पुस्तकाच्या सौदर्यांत भर पडली आहे. किंमत माफक असल्यामुळे स्वत:साठी सहज घेता येईल, शिवाय भेटवस्तु म्हणून (योग्य व्यक्तीस) देण्यास उत्तम! सर्व शिक्षक वर्गास उत्तम असे हे पुस्तक!
वनस्पतींची अद्भुत कार्यशैली : डॉ. किशोर नेने
नचिकेत प्रकाशन : कि. 100/- रू.
24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15,
भ्र. 9225210130
भारतीय गणितज्ञांच्या कर्तृत्वाचा रोचक परिचय
नागपूरचे नचिकेत प्रकाशन हे वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर पुस्तके प्रसिद्ध करण्याचे ध्येय बाळगून असलेले आणि या व्यवसायात तसे नवेच असले तरी विचक्षण ग्रंथप्रेमींमध्ये मान्यता मिळालेले आहे. ज्या विषयांना तसा साधारणत: स्पर्श झाला नाही, असे विषय वाचकांपुढे ठेवण्याच्या या मालिकेत गणिताचे सिद्धहस्त व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक श्री अनंत वासुदेव व्यवहारे यांचे भारतीय गणिती हे पुस्तक “नचिकेत प्रकाशन”ने नुकतेच प्रकाशित केले आहे. गणित हा विषय सर्वसामान्य माणसासाठी तसा रूक्ष असतो. पण या शास्त्राच्या आधारानेच अन्य शास्त्रे व कलविश्र्वही बहरते. गणित हा एका अर्थी सर्व शास्त्रांचा पायाच आहे. या विश्र्वाचे संचालन अत्यंत काटेकोर पद्धतीने चालते, आकाशस्थ ग्रहगोलांच्या चलन व परिचालनाचे परिणाम मानवी जीवनावर होतात या दृढ विश्वासातून प्राचीन भारतीय गणितज्ज्ञ व ज्योतिर्विदांनी याचे रहस्य उलगडायला प्रारंभ केला. आर्यभट्ट-प्रथम यांच्या पासून सुरू झालेल्या या गणितज्ञांच्या प्रयत्नांना पुढे अनेक भारतीय गणितींनी आपापल्या परीने विकसित केले. याचे फलित म्हणूनच भारतीय गणितशास्त्र सर्व जगापुढे एक प्रगत व परिणत शास्त्र म्हणून प्रकट झाले. अशा 51 थोर भारतीय गणितज्ञांच्या कार्यकर्तृत्त्वाचा परिचय प्रा. व्यवहारे यांनी या पुस्तकातून घडविला आहे. आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कर, ब्रह्मगुप्त, लल्लाचार्य, महावीराचार्य, श्रीधराचार्य, माधव, परमेश्र्वरन असे इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत गणित अभ्यासणाऱ्या संशोधकांचा परिचय वाचताना मन थक्क होते. या प्रत्येकाने लिहिलेल्या मूळ संस्कृत ग्रंथांची यादीच लेखकाने दिली आहे. आर्यभटांचे क्रांतिकारी विचार, वराह मिहिरांचे फलज्योतिष साधन, लल्लाचार्यांचे कालमापन,अंकगणित व महत्वमापनावरील श्रीधराचार्यांचे मूलभूत संशोधन, माधवांची धनभूमिती याची अत्यंत रोचक माहिती प्रा.व्यवहारे यांनी त्या-त्या ग्रंथामधील मूळ संस्कृत श्र्लोकांसह आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह दिलेली आहे.पंधराव्या शतकाच्या शेवटी जन्माला आलेले केरळी गणिती ज्येष्ठदेव यांच्या पासून आधुनिकाळातील प्रसिद्ध गणिती श्रीनिवास रामानुजन या कालखंडातील महत्वाचे गणिती म्हणजे स्वामी भारती कृष्णतीर्थ शंकराचार्य हे होत. वैदिक गणिताचे हे प्रणेते. स्वत: प्रा.व्यवहारे हे वैदिक गणिताचे सखोल अभ्यासक व प्रचारकही आहेत. यामुळे हा लेख जरा विस्तृत आहे. सामान्य परिस्थितीतून वर आलेला पण आपल्या विलक्षण आणि मेधावी प्रतिभेने जगाचे डोळे दिपवून टाकणारा भास्कराचार्यांनंतरचा भारतीय गणिती म्हणजे श्रीनिवास रामानुजन्! यांच्यावरील लेखही माहितीपूर्ण आहे. अठरावे, एकोणीसावे व विसावे शतक वैज्ञानिक व औधौगिक क्रांतीसोबतच अवकाश संशोधनाच्या दिशेने पावले टाकणारे ठरले. त्यात डॉ. सत्येंद्रनाथ बोस, डॉ. राजचंद्र बोस, डॉ. सी.एस.वेंकटरमण, डॉ.जयंत नारळीकर, डॉ.नरेंद्र करमरकर, डॉ. प्रभुलाल भटनागर, डॉ. अमलकुमार रॉय चौधरी, राधानाथ सिकदार, डॉ. सर्वदमन चावला, डॉ. हरिश्र्चंद्र खरे यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच द.रा.काप्रेकर, डॉ.के.ल.दप्तरी, डॉ. हरिश्र्चंद्र खरे यांचाही वाटा आहे. अशा 51 दिग्विजयी गणितज्ञांची माहित एकमित्र करणे व ती परिष्कृत करून सामान्य वाचकांसाठी पुस्तकरूपाने उपलब्ध करून देणे, हे सोपे काम नाही, कारण हा विषयच वेगळा आहे. प्रा. व्यवहारे यांनी अत्यंत परिश्रमाने ही माहिती संकलित केली. ते स्वत: गणिताचे प्राध्यापक असल्याने या विषयाकडे त्यांनी एका स्वतंत्र दृष्टिकोनातून पाहिले. देशाच्या उभारणीसाठी याही शास्त्रज्ञांचे योगदान फार महत्वाचे असून त्या प्रयत्नात या गणितज्ञांनी भारताची मान उंचावण्याचा प्रयत्न कसा केला, याचेही दर्शन प्रा.व्यवहारे यांनी घडविले आहे. गणिताचे प्राध्यापक, अध्यापक, विद्यार्थी व गणितात रूची असणाऱ्यांसाठी हा ग्रंथ म्हणजे एक “गोल्डन ट्रेझरी” आहे. विशेषत: गणिताच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे, संग्रही ठेवले पाहिजे. ग्रंथाच्या शेवटी प्रा. व्यवहारे यांनी संदर्भ ग्रंथांची यादी दिल्याने ते ग्रंथ वाचण्याची उत्सुकता लागावी. गणितासारखा जड विषय असूनही लेखकाची शैली सहज व प्रासादिक आहे. त्यामुळे लेखनाला लालित्याचाही स्पर्श झाला आहे. नागपूरच्या मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक राहिलेले जुन्या पिढीतील सिद्धहस्त गणित प्रबोधक व प्रा. व्यवहारेंसह अनेकांचे गुरू असलेले कै. प्रा. श्रीनिवास मंगळगिरी यांना हा ग्रंथ लेखकाने अर्पण केला आहे. एक उत्तम, दर्जेदार पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आणि त्याचे अंतरंग व बहिरंगही दर्जेदार राखल्याबद्दल प्रकाशकांचे अभिनंदन!
प्रकाश एदलाबादकर
भारतीय गणिती
प्रकाशक लेखक-प्रा. अनंत व्यवहारे
नचिकेत प्रकाशन
पृष्ठे-180 मूल्ये-180 रू.
आपली सूर्यमाला
नजिकच्या अंतराळाची सर्वांग सुंदर ओळख!
आपल्या सूर्यमालेबद्दल भारतीय संस्कृतीत कुतूहल, आकर्षण, आदर, भीती अशा संमिश्र भावना प्राचीन काळापासून कायम आहेत. सूर्याची महती गाणारे सूर्योपनिषद्, सूर्य स्तोत्रे तर आहेतच पण आपल्या व्यायामात पण सूर्यनमस्काराचे महत्त्व आहे. चंद्राच्या कला बघून आपण रोजची तिथी, महत्त्वाचे सण निश्र्चित करतो. सूर्यमालिकेतील नवग्रहांची सातत्याने कृपा रहावी म्हणून आपण नवग्रह स्तोत्राचा पाठ नेमाने करतो, निरनिराळ्या खड्यांच्या अंगठ्या धारण करतो, उपवास धरतो. आपल्या काव्यात, संगीतात चंद्र, शुक्र ही लोकप्रिय स्फूर्तिस्थाने आहेत व “चांदोबा चांदोबा भागलास का?” या बालगीतापासून “शुक्रतारा, मंद वारा—” या प्रेमगीतापर्यंत असंख्य रचना आपल्या मनास भिडल्या आहेत. ह्या वर्षी आपण “चंद्रयान-1″ चंद्राभोवती सोडून” साऱ्या जगाला आश्र्चर्यचकित केले आहे व भविष्यात मंगळावर स्वारी करण्याचा विचार करीत आहोत. सर्व पार्श्र्वभूमीवर आपली सूर्यमाला कशी आहे?, त्यातील ग्रहांचे स्वरूप कसे आहे? त्यावर मानवाचे संशोधन कसे होत गेले? ह्या सर्व पैलूंवर शास्त्रोक्त माहिती आजच्या पिढीला व्हायला हवी व ही कामगिरी डॉ. मधुकर आपटे यांनी “आपली सूर्यमाला” हे पुस्तक उत्तम रीतीने लिहून कुशलतेने पार पाडली आहे.
नचिकेत प्रकाशनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकात एकूण 18 प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात आपल्या सूर्यमालेबद्दल प्रस्तावना आहे आणि त्यानंतर “आपला निर्माता व रक्षणकर्ता सूर्य” याबद्दल माहिती दुसऱ्या प्रकरणात दिली आहे. त्यानंतरच्या 10 प्रकरणात बुध,शुक्र, पृथ्वी, चंद्र मंगळ, लघुग्रह, गुरू, शनी, युरेनस, नेपच्युन या ग्रहांचे विस्ताराने वर्णन केले आहे. या प्रत्येक प्रकरणाला दिलेला मथळा पण आकर्षक व अर्थपूर्ण आहे. निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी प्रत्येक ग्रहाबद्दल जे संशोधन केले आहे, त्याचा आढावा घेऊन लेखकाने त्या ग्रहाचे वातावरण, जडण, घडण, भूगोल, भूगर्भ इत्यादी गुणधर्माबद्दल नवीन व मौल्यवान माहिती या पुस्तकात समाविष्ट केली आहे. वाचकाला केवळ ग्रहांची माहिती देऊनच डॉ. आपटे थांबले नाहीत तर ग्रहण, उल्का आणि उल्कापात, सूर्यमालेचा सीमाप्रदेश, अनंताकडे झेपावणारे वाहन, धुमकेतू, आकशगंगा सारख्या सूर्यमालेशी निगडीत असलेल्या विषयांवर आणखी सहा प्रकरणे लिहून खगोलशास्त्राबद्दल नवीन माहिती पुढे मांडली आहे.
या पुस्तकाचा विषय जरी शास्त्रीय असला तरी लेखकाच्या रसाळ शैलीमुळे सर्व निवेदन क्लिष्ट न वाटता मनोरंजक वाटते. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजी संज्ञा फार कमी व आवश्यक जागीच वापरण्यात आल्या आहेत आणि मराठी शब्दांचा वापर जास्तीत जास्त केला गेला आहे. आजच्या शालेय विद्यार्थ्यांच्या मनात खगोलशास्त्र, अवकाशयानांमागील शास्त्र व तंत्र, रॉकेट तंत्र विद्या वगैरे विषयांबद्दल उत्कट जिज्ञासा आहे. त्यांच्या दृष्टीने डॉ. आपटे याचे हे पुस्तक फार उपयोगी व ज्ञानपुरक आहे. प्रत्येक पालकाने, शिक्षकाने व शालेय विद्यार्थ्याने जवळ बाळगावे, असे हे पुस्तक आहे. असे म्हणतांना एक सूचना कराविशी वाटते. आज-कालची पिढी Computer-Sawy किंवा संगणक दिवानी झाली आहे व इन्टरनेट वरील निरनिराळ्या संकेतस्थळांना (Websites) भेट देऊन ते ज्ञानाची नवी, नवी दालने उघडत असतात. सूर्यमालेचे दुर्मिळ रंगीत फोटो व इतर उपयुक्त माहिती अशा अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. या संकेतस्थळांची यादी जर या पुस्तकाच्या शेवटी दिली गेली तर पुस्तकाची उपयोगिता आणखी वाढेल व पुस्तकातील लिखीत मजकुराला दृश्य चित्रांची मदत मिळून वाचकांच्या ज्ञानात मोलाची भर पडेल. डॉ. रमेश सिंगरू
आपली सूर्यमाला , लेखक डॉ. मधुकर आपटे
पृष्ठ संख्या : 96 : किंमत : रू 90/-
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन,मो. 9225210130
नक्षत्र मैत्री
निरभ्र आकाशातील असंख्य चांदण्यांचे द्रुष्य अतिशय मनोहारी वाटते. या लुकलुकणाऱ्या चांदण्यांबद्दल सर्वांच्याच मनात मोठे कुतुहल असते. उंच आकाशात चमकणारे हे हिरे असल्याचे बालकांना वाटते, तर कधीही नष्ट न होणारी ही नक्षत्रे असल्याचे मोठ्या माणसांची कल्पना असते. नक्षत्रांची नावे अनेकांना माहीत असतात. परंतु ती नेमकी कशी दिसतात? आकाशात कुठे आणि केव्हा दिसतात, हे माहीत नसते. तसेच त्यांना अशी ठराविक नावे का देण्यात आली? त्याच्यामागे काही कथा आहेत की काय? असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात असतात. असल्या विविध प्रश्र्नांची समर्पक उत्तरे नक्षत्र मैत्री या लहानशा पुस्तकात प्रसिद्ध वैज्ञानिक खगोल अभ्यासक आणि साहित्याचे व्यासंगी डॉ. पुरूषोत्तम विश्वनाथ खांडेकर यांनी अत्यंत सरळ सोप्या भाषेत दिली आहेत.
आकाशाचे अवलोकन करताना एकावेळी एका लहानशा भागावरच नजर खिळलेली असते. त्या भागात दिसून येणाऱ्या आकाशस्थवस्तू पाहून आपण त्या भागाचे द्रुष्य पाहण्याचा अनुभव घेतो. म्हणून त्या भागाची सविस्तर माहिती कथन करणाऱ्या मजकुराला त्या भागावरील प्रकरण हा नेहेमी वापरण्यात येणारा शब्द न वापरता लेखकाने द्रुष्य हा शब्द वापरून पुस्तकाचे वेगळेपण दाखविले आहे. अशी वेगवेगळी तेरा द्रुष्ये दाखवून संपूर्ण आकाशाची माहिती या पुस्तकातून मिळते.वैज्ञानिक माहितीच्या जोडीला विविध नक्षत्रां विषयीच्या प्राचीन कथा आणि त्यांच्या बद्दलच्या काव्यपंक्ती जागो जागी दिल्याने पुस्तक उद्बोधक आणि मनोरंजक झाले आहे.
नक्षत्रांमधील तारे, दीर्घिका, तेजोमेघ इत्यादि वस्तू अतिशय दूरस्थ आहेत. त्या प्रचंड मोठ्या आणि अतिशय उष्ण असल्याचे वाचून ही प्रचंड मोठी अंतरं वस्तूमान, तापमान इत्यादी नेमकी कशी ठरविली जातात, हा प्रश्र्न वाचकांपुढे उभा राहातो. पुस्तकात वेगळी परिशिष्ठे जोडून लेखकाने या प्रश्र्नांना समर्पक उत्तरे दिली आहेत. पुस्तकाला उत्तम रंगीत मुखपृष्ठ दिले आहे. मजकुरातील माहिती स्पष्ट करणाऱ्या योग्य आकृत्या आणि चित्रे दिली असल्याने पुस्तक अधिकच आकर्षक झाले आहे.
डॉ. मधुकर आपटे
शीर्षक : नक्षत्र मैत्री
लेखक : डॉ.पु.वि.खांडेकर, पृष्ठ संख्या 61, किंमत : 60/- रू
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, नागपूर, भ्र.9225210130
गौरवशाली प्रगत संशोधन करणारे भारतीय वैज्ञानिक
अनेक शतके भारत विविध आक्रमणांना तोंड देत राहिल्याने या देशात औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली स्थिरता आणि शांतता नव्हती. सतत लढाया, अशांतता होती. यामुळे मधल्या काळात येथे संशोधनासाठी पूरक वातावरण निर्माण होऊ शकले नाही. मात्र तरीही वैदिक काळात व नंतरही भारतात विविध विषयांवर संशोधन झाले होते. त्याकाळी व त्यानतर भारताने संशोधन क्षेत्रात केलेल्या गौरवशाली प्रगतीची ओळख करून देणारे काही साहित्य जाणीवपूर्वक प्रकाशित होत असते. नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले डॉ. मधुकर आपटे यांचे “भारतीय वैज्ञानिक” हे पुस्तक अशाच प्रकारातील आहे. या पुस्तकाबाबत उल्लेखनीय बाब म्हणजे जुन्या काळात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीची माहिती मोघम व अस्पष्ट नसून थोडक्यात पण अतिशय मुद्देसूद आहे. उदाहरणार्थ- “प्राचीन भारतीय खगोलविद आर्यभट्ट” मध्ये आर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याबाबत व पृथ्वीवरील नाक्षत्र दिनाचा (Sidereal Day) काळ काढण्याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती देताना नमूद केले आहे की- “आर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याची पद्धत सांगून पृथ्वीचा परिध 24,835 मैल असल्याचे सांगितले. हा आकडा आधुनिक पद्धतीने पृथ्वीचा परिध काढून सर्वत्र मान्यताप्राप्त पृथ्वीच्या परिघापेक्षा (24,902 मैल) फक्त 0.2 टक्के कमी आहे. आर्यभट्टांनी त्यांच्या गणिताने पृथ्वीवरील नाक्षत्र दिनाचा काळ 23 तास 56 मिनिटे 4.1 सेकंद ठरविला होता. त्याचा आधुनिक काळ 23 तास 56 मिनिटे 4.01 असल्याचे पाहून आर्यभट्टांच्या गणितातील अचूकता जाणवते. तसेच त्यांनी ठरविलेल्या नाक्षत्र वर्षाच्या काळात सध्याच्या मान्यताप्राप्त काळाच्या तुलनेत फक्त 3 मिनिटे 20 सेकंदाची चूक दिसते. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध शल्यविशारद सुश्रुत यांच्याबाबतच्या माहितीत म्हटले आहे की, त्यांच्या “सुश्रुत संहिता” या संस्कृत ग्रंथात 184 प्रकरणे असून त्यात 1120 आजारांची वर्णने आहेत. यात 120 प्रकरणात शस्त्रक्रियेची सविस्तर माहिती, इतर 64 प्रकरणात औषधांची माहिती आहे. तसेच औषधात वापरल्या जाणाऱ्या 700 वनस्पती, 64 खनिज आणि 57 प्राण्यांचीही सविस्तर माहिती आहे. शस्त्रक्रियेचे आठ प्रकार, पट्टीबंधनाचे (Bandages) चौदा प्रकार आणि शस्त्रक्रियेच्या शंभराहून जास्त उपकरणांचे वर्णनही “सुश्रुत संहितेत आहे.” पुस्तकातील सर्वच लिखाण असेच शास्त्र व आधार यांना धरून लिहिलेले आहे. या पुस्तकात खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट, वैद्यक शास्त्राचे सुश्रुत यांच्याशिवाय चरक, नागार्जुन, अणुसंकल्पनेचे जनक कणाद, गणितज्ज्ञ भास्काराचार्य या प्राचीन काळातील संशोधकांसोबतच आधुनिक काळात विविध क्षेत्रात संशोधक म्हणून मान्यताप्राप्त भारतीय संशोधक डॉ. जगदीशचंद्र बोस, सर सी. व्ही. रमण, श्रीनिवास रामानुजम, होमी भाभा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. जयंत नारळीकर अशा एकूण 25 संशोधकांचे जीवन आणि कार्य याबद्दल सखोल, सविस्तर व सचित्र माहिती आहे. पुस्तकाची भाषा गोष्ट सांगण्यासारखी सोपी आणि सहज समजणारी आहे. नचिकेत प्रकाशनाची अंतरबाह्य दर्जेदार निर्मिती आहे. मुखपृष्ठही कल्पक व आकर्षक झाले आहे. नव्या पिढीला वाचनाची सवय लागावी असा विचार गेल्या काही वर्षात जोर धरू लागला आहे. त्यात मुलांना वाढदिवस, मौंज किंवा सत्कार प्रसंगी पुस्तके भेट देण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्या भेट देण्याच्या पुस्तकांमध्ये “भारतीय वैज्ञानिक”चा समावेश आवर्जून करायला हवा. उत्तम पुस्तकनिर्मितीसाठी लेखक व प्रकाशक दोघाचेही अभिनंदन.
नचिकेत प्रकाशन, नागपूर. 1 विकास कुळकर्णी
(पृ. 112 / किंमत 100 रुपये) भ्र. 9225210130
सांगोपांग माहिती सोप्या भाषेत देणारे
धान्यांची कुळकथा
आपण तांदूळ, गहू, ज्वारी, मका, व विविध प्रकारची कडधान्ये विकत घेत असतो. तांदूळ, गहू, आदी घेऊन आपण घरी येतो. मात्र यातही काही लोक असे असतात की, कोणता तांदूळ हवा, त्याचा प्रकार कोणता, वासाचा आहे की नाही, याची विचारपूस करूनच तांदूळ खरेदी करीत असतो. या व्यक्तीला तांदळाचे जुजबी ज्ञान असते. याहून अधिक ज्ञान शेतकऱ्यास असते. थोडक्यात सांगावयाची गोष्ट अशी की शेती, शेतीशास्त्र, विविध प्रकारची धान्ये, त्याचा इतिहास, त्याच्या जाती, पोटजाती, प्रत्येक जातीचे वैशिष्ट्ये या साऱ्या गोष्टी आपणास म्हणजेच सर्वसामान्य माणसास माहीतच नसतात.
तांदूळ हे एक रानटी गवत आहे, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले ना. मलाही तसेच वाटले होते. परंतु हे सत्य आहे. याच रानटी तृणधान्याने आता जवळपास संपूर्ण जग व्यापले आहे. जगात तांदळाच्या जवळपास 30 हजार जाती आहेत. भारतात लावल्या जाणाऱ्या जातींचेच (वाण) 5 ते 6 हजार प्रकार आहेत. जगातल्या कोणत्याही देशात भारताएवढे प्रकार सापडत नाहीत. वैदिक वाङ्मयातही तांदळाचा उल्लेख आहे. तांदळाचा प्रकार, लवकर येणारा, उशिरा येणारा, कमी पाण्यातला, जास्त पाण्याला, खाऱ्या पाण्यात पिकणारा हा सर्व उल्लेख वैदिक वाङ्मयात आहे. इ.स.पूर्व 320 साली अलेक्झांडरने भारतावर स्वारी केल्यानंतर ग्रीकांना तांदूळ या पिकाची माहिती झाली.
मक्याचे मूळ अमेरिकेत आहे. 75 टक्के मक्याचे पीक अमेरिकेत होते. अमेरिकेच्या जवळपास प्रत्येक प्रांतात मक्याचे पीक घेतले जाते. पौर्वात्य देशात मक्याचा उल्लेख आढळत नाही. बायबल ग्रंथातही मक्याच्या उल्लेख येत नाही. ग्रीक भाषेत मका या अर्थाचा एकही शब्द सापडत नाही. पौर्वात्य चीन व भारताच्या वेदासारख्या प्राचीन वाङ्मयात सुद्धा मक्याचा संदर्भ कुठेही नाही. त्या भागातल्या पुरावशेषात गहू, तांदूळ सापडतात परंतु मक्याचा मागमूसही सापडत नाही.
गव्हाचे प्राचीन दाणे इराकच्या पूर्व भागातल्या जार्मो या ठिकाणी उत्खननात सापडले आहेत. जार्मो खेडे गव्हाची गंगोत्री असावी, असे मानले जाते. भारतीय गव्हालाही प्राचीन इतिहास आहे मोहोंजोदारोच्या उत्खननात गव्हाच्या दाण्यांचे अवशेष सापडले आहेत. डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांनी काही शास्त्रज्ञांच्या मदतीने गव्हाच्या जातीत सुधारणा करीत हरितक्रांतीची पायाभरणी केली होती. 63-64 साली असणारे गव्हाचे एक कोटी टनांचे उत्पादन 1999 पर्यंत साडेसात कोटी टनांवर गेले. धान्याची कोठारे दुथडी भरून वाहू लागली.
ही सर्व माहिती नागपूर मधील नचिकेत प्रकाशन या सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेने धान्यांची कुळकथा हे डॉ. क.कृ.क्षीरसागर यांचे पुस्तक प्रकाशित केले आहे, त्यात वाचावयास मिळते. अवघ्या 62 पानांच्या या छोटेखानी पुस्तकात लेखकाने आपल्याजवळ असलेला कुषी ज्ञानाचा खजिनाच वाचकांसमोर ठेवला आहे. खरे तर सर्वसामान्य माणसाला कृषीक्षेत्राचे काही एक ज्ञान नसल्याने त्याला हे पुस्तक हाती घ्यावेसे वाटणार नाही. परंतु एकदा का या पुस्तकाची पाने वाचावयास सुरूवात केली की मग त्याला पुस्तक खाली ठेवावेसे वाटणार नाही. एका बैठकीतच पुस्तक वाचावेसे वाटेल. पुस्तकाचा टाईपही वाचनीय आहे, सुबक आहे. भाषा किल्ष्ट नाही, सरळ सोपी व मनोरंजक आहे.
विशेष म्हणजे भारतीयांना कृषिशास्त्राचे किती सखोल ज्ञान होते, याची उदाहरणे देऊन वाचकाच्या ज्ञानात भर घालणारे हे पुस्तक आहे. आजचा जमाना फास्टफूडचा आहे. आपण जे अन्न खातो, वा विविध पदार्थांची चव खाखतो. ते कशापासून बनतात. त्यासाठी कोणत्या प्रकारचे धान्य, तेल, भाज्या वापरल्या जातात, याचे ज्ञान आपणास नसते. हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न आपण कधी केला आहे का, असा प्रश्न आपण स्वत:स करून पहावा. आपण खातो ते अन्न धान्य कोठून येते? कसे निर्माण होते? ते कोण तयार करतो? या धान्यांची कुळकथा काय? धान्यांचा इतिहास काय सांगतो? ही धान्ये तयार करताना शेतकऱ्याला किती काबाडकष्ट सहन करावे लागतात, त्यासाठी त्याला कोणकोणत्या प्रकारची साधने वापरावी लागतात. कोणत्या परिस्थितीशी झगडावे लागते. निसर्गावर तो कसा अवलंबून असतो, आदी गोष्टींची आपल्याला काही एक माहिती नसते.
ही सर्व माहिती लेखक डॉ. क्षीरसागर यांनी धान्यांची कुळकथा या छोट्याशा पुस्तकेच्या माध्यमातून सर्वसमान्य वाचकाला देण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. क्षीरसागर यांनी जसे प्रयत्न केले त्याच प्रमाणे नचिकेत प्रकाशनानेही हे पुस्तक प्रसिद्ध करून वाचकाला कृषी क्षेत्राच्या जवळ नेण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. या पुस्तकात लेखकाने तांदूळ, मका, गहू, ज्वारी, कडधान्ये आदींची सविस्तर कुळकथाच आपल्यासमोर उलगडून दाखविली आहे. विविध जातींच्या धान्यांची माहिती देत असतानाच त्या त्या धान्याची तुलनात्मक आकारमानाची रेखाचित्रेही दिली आहेत. छायाचित्रे व रेखाचित्रे यांचा वापर करून पुस्तक सजीव करण्याचा चांगला प्रयत्न झाला आहे. ज्वारीच्या शास्त्रीय वर्गीकरणाबरोबरच आपल्याला माहीत नाही असे ज्वारीचे किती तरी औद्योगिक उपयोगही पुस्तकात नमूद करण्यात आले आहेत.
पुस्तकाच्या अखेरीस भविष्यात अन्नधान्याचा तुटवडा या विषयी भारतातील आतापर्यंतच्या आर्थिक व अन्नधान्य समस्यांचा लेखकाने धावता आढावा घेऊन अन्न उत्पादनातील विविध घटकांविषयी सांगोपांग चर्चा केली आहे. भविष्यात अन्नधान्याची समस्या कशी सोडवू शकू, यासंदर्भात विवेचन करून दिलासा दिला आहे.
एकूणच काय तर लेखकाने सर्वसामान्य वाचकाला वाचावासा न वाटणारा विषय अत्यंत सोप्या भाषेत, ज्ञानात भर घालत वाचकांच्या मनापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. नुसताच पोचविला नाही तर कृषिक्षेत्राविषयी आपुलकी निर्माण करणारा आहे. शेताच्या बांधाकडे आपली पाऊले वळवावयास बाध्य करेल, असे हे पुस्तक आहे, असे म्हणता येईल.
हे पुस्तक प्रकाशित करून नचिकेत प्रकाशनाने साहित्य क्षेत्रात एक नवी चांगली भर घातली आहे, असे म्हणावे लागेल.
धान्याची कुळकथा विलास कुळकर्णी
पाने : 62, किंमत : 60 रू.
लेखक : डॉ. क.कृ. क्षीरसागर
प्रकाशक: नचिकेत प्रकाशन, नागपूर
मो. 9225210130
कीटकांची नवलाई
पृथ्वीतलावर परमेश्वराने कितीतरी प्रकारची प्राणी सृष्टी, पशुपक्षी, कीटकांची निर्मिती केली आहे. महाकाय डायनासोर पासून ते अगदी सुक्ष्मातील सुक्ष्म बॅक्टेरियापर्यंत त्याने निर्मिती केली आहे. यातील काही प्राणी, पशुपक्षी, कीटक काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. अद्यापही अस्तित्वात असलेली संपूर्ण प्राणिसृष्टी आपल्या परिचयाची झालेली नाही. यापैकी जमिनीवर काही वावरतात, काही आकाशात विहार करतात तर काही पृथ्वीच्या आत असतात आणि काही पाण्यात असतात. यात कीटकवर्गही मोडतो.
परमेश्वराने निर्माण केलेला कीटकवर्गही फार मोठा आहे. संशोधक त्याचा सतत शोध घेत असतात. त्यांना नवनवीन कीटक सापडत असतात. त्याप्रमाणे ते त्याची नोंद करून ठेवत असतात. आपल्याजवळ ते सतत असूनही वा आपण त्यांच्या भोवती सतत असूनही त्यांची खरी ओळख आपणास झालेली नसते. अशा कीटकांची ओळख प्राचार्य श्री. सुधीर सहस्त्रबुद्धे यांनी कीटकांची नवलाई या पुस्तकाच्या माध्यमातून करून दिली आहे. नागपूरच्या सुप्रसिद्ध अशा नचिकेत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित करून एका अनोख्या जगाची ओळख सर्वसामान्य वाचकांना करून दिली आहे, ही खरोखर एक चांगली गोष्ट आहे.
कथा, कांदबऱ्या तर आपण वाचतच असतो. परंतु आपल्या सभोवताल असलेल्या प्राण्यांची, कीटकांची ओळखही करून देण्याचे कार्य नचिकेत प्रकाशनाने पार पाडले आहे. पार पाडले यासाठी की हल्ली अशा लिखाणाकडे कुणी वळत नाही. असो, तर प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या या छोटेखानी पुस्तकातून टोळ, फुलपाखरू व पंतग, गांधील माशी, मधमाशी, भुंगा, रक्तपिपासू ठेकूण, घरगुती माशी, विषजंतू, पिसवा, डास, उशई, विषारी कोळी, चिचुंद्री, झुरळ ऊ, मुंगी, सूक्ष्म जंतू, काजवा व कानघोण या कीटकांच्या जीवनपरिचय करून दिला आहे.
या कीटकांची उत्पत्ती, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचा जीवनक्रम, त्यांची संरक्षण व्यवस्था, एखाद्या कीटकांमध्येही असलेले वेगवेगळे प्रकार, फुलपाखराच्या विविध जाती, मधमाशांचे, भुंग्यांचे प्रकार, आता जवळपास नष्ट होत असलेला ढेकूण, तो रक्त कसे शोषण करतो? घरात वावरणारी माशी, तिचा जन्म, विकास,तिच्यामुळे होणाऱ्या रोगांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता कशी राखावी, माशी निर्मूलन कसे करावे, हेही लेखकाने सांगितले आहे. जे जंतू साध्या डोळ्यांनी किंवा सूक्ष्मदर्शक यंत्रांनीही दिसत नाहीत, असे विषजंतू इलेक्ट्रॉम मायक्रो स्कोपद्वारे दिसतात. हे जंतू जीवित व अजीवित अशा दोन स्वरूपाचे असतात. या जंतूंमुळे मानवाला अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. फळे, भाजीपाला व खाद्य पदार्थांनाही हे जंतू सोडत नाहीत. या जंतूंपासून दूर राहण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचा मानवाने प्रयत्नकेला पाहिजे, याकडेही लक्ष वेधले आहे.
उधई सारखा कीटक जगात सर्वदूर आढळतो. उधई ही लाकूड, पुस्तके, अडगळीच्या वस्तू, कागदपत्रे, मातीची भांडी यात आढळून येते. काही झाडांना उधई लवकर पकडते. उशईने अमेरिकेतील काही राज्यांत सळो की पळो करून सोडले होते, यावरून उधईची ताकद दिसते.
रोज घरात दिसणारे झुरळ. त्याचे 3500 प्रकार आत्तापर्यंत ज्ञात झाले आहेत. घरातील व घराबाहेरील झुरळ, त्याचे प्रजनन देशोदेशीचे झुरळ, त्यांचा नायनाट आदी संदर्भात लेखकाने माहिती दिली आहे.
एकूणच काय तर संपूर्ण कीटक विश्वाचा पसारा अद्याप पूर्णपणे ज्ञात झालेला नाही. जे काय त्यांच्या संदर्भात थोडेफार ज्ञान झाले आहे ते ही फार स्तिमित व मंत्रमुग्ध करून देणारे आहे. ऍनिमल प्लॅनेट वा नॅशनल जिऑग्राफी वा डिस्कव्हरी या चॅनेल करूनही आपण ही जीवसृष्टी न्याहाळतो परंतु त्याची सविस्तर माहिती आपणास माहीत नसते. ती लेखक श्री. सहस्त्रबुद्धे यांनी या पुस्तकातून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. असे म्हणता येईल.
कीटकांची नवलाई :
लेखक :प्राचार्य सुधीर सहस्त्रबुद्धे
पृष्ठे : 128, कि. 115 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, नागपूर-15
भ्र.9225210130
निसर्गाची नवलाई
निसर्ग म्हणजे एक अत्यंत निष्णात असा कलाकार आहे. अनेक नयनरम्य स्थळे निसर्गाने निर्माण केली आहेत. आश्र्चर्याने थक्क करून सोडणारे विविध नैसर्गिक अविष्कार निरनिराळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या द्रुष्यांनी मनाला आनंद आणि समाधान मिळत असल्याने अशा स्थळी जाण्याची सर्वांची इच्छा असते. परंतु ते नेहेमीच जमते असे नाही. तेव्हा त्यांची छायाचित्रे पाहावीत आणि रसभरीत वर्णनं वाचावीत, असे देखील नक्कीच वाटते. इंग्रजी भाषेतील अनेक ग्रंथ ही इच्छा पूर्ण करतात, हे निश्र्चित . परंतु ते ग्रंथ सर्वत्र उपलब्ध नसतात शिवाय त्यांच्या किमती देखील बऱ्याच जास्त असल्याने सर्वसामान्य मराठी वाचकाला ते ग्रंथ मिळू शकत नाहीत. असल्या अडचणी लक्षात घेऊन काही मराठी लेखकांनी नैसर्गिक अविष्कार आणि सौदर्याचे वर्णन करणारी पुस्तके लिहिली आहेत. परंतु त्यांची संख्या अल्प आहे. ही बाब विचारात घेऊन प्रा.सुधीर सहस्त्रबुद्धे यांनी निसर्गाची नवलाई हे लहानसे पुस्तक लिहून आणि नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने ते उत्तम रीत्या प्रकाशित करून जिज्ञासू मराठी वाचकांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास हातभार लावला आहे. यासाठी प्रा. सहस्त्रबुद्धे आणि नचिकेत प्रकाशन यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
एकूण 25 लेखांच्या या पुस्तकात ‘बॅड लॅन्डस्’, ‘प्रचंड खिंड’, ‘ग्रेट सॉल्ट लेक’, ‘मृत दरी’, ‘मृत समुद्र’, ‘नैसर्गिक गरम पाण्याचा झरा’, इत्यादी नऊ लेखांमधून विविध ठिकाणांचे वर्णन केले आहे. ‘पाऊस कसा येतो’, ‘हिमनग वा हिमगिरी’ ‘तुफानी वादळ’ अशा लेखातून नैसर्गिक अविष्कार कसे घडतात, याचे स्पष्टीकरण अतिशय सोप्या पद्धतीने केले आहे. सर्व लेखांची सुरूवात अत्यंत आकर्षक तऱ्हेने केली असल्याने संपूर्ण लेख वाचण्याची सहजच इच्छा होते, आणि लेखाचे पूर्ण वाचन झाल्यावर एखादी नवीन माहिती कशी सहजपणे मिळाल्याने आनंद होतो. पुस्तकाचे रंगीत मुखपृष्ठ आतील माहितीला अनुरूप असून फारच आकर्षक असे आहे. पुस्तकाचा कागदही उत्तम दर्जाचा वापरला असून अक्षरांचा आकार (Font Size) योग्य असल्याने मजकूर वाचायला अजिबात त्रास होत नाही. अंतरंग व बाह्यरंग दोन्ही दृष्टीने पुस्तक उत्तम झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांना हे पुस्तक फारच उपयुक्त वाटेल, अशी आशा वाटते.
लेखक : प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे डॉ. मधुकर आपटे ,नागपूर
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर वर्धा रोड, नागपूर-15 , फ़ोन : ९२२५२१०१३०
पृष्ठ संख्या : 92 किंमत : रू 90/-




