महर्षी भृगू, मृत्यूंजय मार्कंडेय आणि भावना ऋषी या तीन महापुरुषांची चरित्रे
एप्रिल 20, 2011 by granthasampada
महर्षी भृगू, मृत्यूंजय मार्कंडेय आणि भावना ऋषी या तीन महापुरुषांची चरित्रे
नचिकेत प्रकाशनातर्फे प्रसिद्ध


कर्नाटक आणि आंध्रप्रदेशाला लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्रात बहुसंख्येने वसलेल्या व प्रामुख्याने विणकर व्यवसायात असलेल्या पद्मशाली समाजाचे आराध्य असलेले महर्षी भृगु आणि त्याच कुलपरंपरेतील मार्कंडेय ऋषी आणि भावना ऋषी यांच्यावर प्रा. विजय गोविंदराव यंगलवार यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेल्या तीन नव्या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच नागपूरच्या नचिकेत प्रकाशनने केले आहे. महर्षी भृगु, मृंत्युजय मार्कंडेय ऋषी आणि वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी नावाची ही तीन पुस्तके केवळ पद्मशाली समाजच नव्हे तर अन्यही समाजातील वाचकांच्या पौराणिक, सामाजिक आणि ऐतिहासिक माहितीत भर घालणारी आहेत.
आपल्या समाजाचे आपण काही देणे लागतो ही जाणीव खरे तर प्रत्येक माणसात आणि विशेषत: प्रत्येक शिक्षित माणसात असावयास हवी, पण दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. त्यामुळे विविध रंगी, विविध ढंगी भारतीय समाजजीवनातील अनेक शाखांचा इतिहास, कर्तृत्व, परंपरा यांची माहितीच काय, अस्तित्व देखील नामशेष झालेले आहे. पण प्रा. यंगलवार यांनी प्रकर्षाने ही जाणीव ठेवून पद्मशाली समाजाचा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. पद्मशाली यशोगाथा या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने पद्मशाली समाजाच्या सखोल अभ्यासाचा वसा घेतलेल्या प्रा. यंगलवार यांनी, त्या दिशेत पुढचे पाऊल टाकताना महर्षी भृगु मृत्युंजय मार्कंडेय ऋषी आणि वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी या तीन पुस्तकांची एक मालाच जणु समाजपुरुषाच्या गळ्यात टाकली आहे. अशा विषयांवर मान्यवर विद्वान लेखकांकडून मुद्दाम लिहून घेऊन ती पुस्तके प्रकाशित करून ही माहिती हे ज्ञान संपूर्ण समाजापर्यंत नेण्याचे जे धोरण नचिकेत प्रकाशन राबवित आहे त्यासाठी त्यांंचे अभिनंदन केले पाहिजे आणि अन्य समाज पुरुंषावरही त्यांच्याकडून अशीच पुस्तके प्रकाशित होतील. अशी अपेक्षा करू. या ही तीनही पुस्तके अतिशय उत्तम, दर्जेदार व देखणी झाली आहेत. सर्वच मुखपृष्ठ आकर्षक आहेत. दर्जेदार पुस्तकाची परंपरा नचिकेत ने कायम राखली आहे.
महर्षी भृगु :
सृष्टीकर्ता भगवान ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांमध्ये ज्येष्ठ व श्रेष्ठ असलेल्या भृगु ऋषींची केवळ पौराणिकच नव्हे तर, आज जगात इतस्तत: विखुरलेल्या भृगुकुलोत्पन्नांची साधार व अभ्यासपूर्ण माहिती प्रा. यंगलवार यांनी या पुस्तकात दिली आहे. महर्षी भृगुंच्या जन्माच्या विविध कथा, त्यांचे पौराणिक दाखले, त्यांचा कुलविस्तार, त्यांचे कार्य, त्याचे आध्यात्मिक, सामाजिक महत्व अशी चौफेर माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. सामान्यत: वाचकांना महर्षी भृगुंच्या भृगुसंहिता या ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथाचीच माहिती असलेली आढळते. मात्र महर्षी भृगु यांनी ऋग्वेद, अथर्ववेद यांच्यावर केलेले विपुल लेखन, वास्तुशास्त्र, आयुर्वेदसंहिता, भृगुस्मृती, वेदान्तावरील भृगु-गीता आदींचाही परिचय या पुस्तकात लेखक प्रा. यंगलवार यांनी करून दिला आहे. महर्षी भृगु यांच्याशी संबंधित भारतातील प्रमुख स्थाने आणि तेथे होणाऱ्या कार्यक्रमांची माहितीही लेखकाने रोचकपणे दिली आहे. अवघ्या साठ पानांचे आणि नाममात्र 60 रुपये किंमतीचे हे पुस्तक पद्मशाली समाजासाठी जणु भृगु-पुराणच ठरावे. पृ. 62 किं. 60 रू.
मृत्युंजय मार्कंडेय ऋषी :
महर्षी भृगु यांची कुलपरंपरा फार मोठी आणि कर्तृत्वान वंशजांनी युक्त असली तरी त्यात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते त्यांचे पणतू मार्कंडेय ऋषी यांचे. भृगुंचे नातू मृकंड यांना मोठ्या तपश्चर्येनंतर भगवान शंकराच्या प्रसादाने झालेला हा मुलगा दिगंत कीर्तीवान ठरला. तेजस्वी व कर्तृत्वान मुलगा हवा असेल तर तो केवळ सोळा वर्षेच जगणारा मिळू शकेल, असे भगवान शंकराने वर देतांना म्हटले, तेव्हा मृकुंड-पत्नी मरुध्वती हिने मोठ्या आनंदाने तो मुलगा मागून घेतला. मात्र पुढे या मार्कंडेयाने तपोबलाने व वशिष्ठ आणि ब्रह्मदेवाच्या कृपेने मृत्यूवर मात केली आणि दीर्घायुष्य प्राप्त केल. ते मृत्युंजय ठरले, अशी पुराणात कथा आहे. चिरंजीव असलेल्या मार्कडेयांचे सर्व विषयांवरील ज्ञान आणि संशोधन विलक्षण आहे. या पुस्तकात लेखकाने त्याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. याशिवाय प्रसंगानुरूप त्यांनी रचलेले मृत्युंजयस्तोत्र, पितृपीडानिवारक स्तोत्र, त्यांनी केलेली नर्मदा परिक्रमा, भविष्यवर्णन यांचीही माहिती लेखकाने यात पेरली आहे. मार्कंडेय ऋषींची ग्रंथसंपदा, त्यांनी विविध प्रसंगानुरूप भेटी दिलेल्या स्थानांची माहिती, तेथील दिनविशेष व कार्यक्रम आदींची माहितीही प्रा. यंगलवार यांनी दिली आहे. या पुस्तकात विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मार्कंडा या शिव-तीर्थांची आणि तेथून जवळच असलेल्या आमगाव (महाल) येथील दोन दुर्लक्षित मार्कंडेश्वर मंदिरांची विस्तृत माहिती देखील दिली आहे. भारतीय पौराणिक साहित्यामध्ये जी 18 पुराणे आहेत, त्यात एक अतिशय महत्वाचे असे मार्कंडेय पुराण देखील आहे. मार्कंडेय ऋषींचे पौराणिक महत्व विशद करण्यासाठी याहून अन्य दाखल्याची गरज भासू नये. पृ. 122 किं. 120
वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी :
पद्मशाली समाजाची उत्पत्ती ज्यांच्यापासून झाली अशी प्रगाढ श्रद्धा या समाजात ज्यांच्याबद्दल आहे, त्या भावना ऋषी यांच्यावर आतापर्यंत फारशी माहिती उपलब्ध नव्हती. ती उणीव दूर करण्याचे अतिशय महत्वाचे काम प्रा. यंगलवार यांनी या पुस्तकाच्या रूपाने केले आहे. तसे हे अतिशय छोटेखानी पुस्तक असले तरी त्याचे संदर्भाच्या दृष्टीने महत्व फार मोठे आहे. एका पौराणिक कथेनुसार, कालवासुर नामक एका महाविनाशकारी राक्षसाचा वध ब्रह्मदेवाच्या वरदानाने केवळ अयोनिज वीराच्याच हातून घडणार होता. ब्रह्मचारी मार्कंडेय ऋषींनी केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञानंतर असा पुत्र यज्ञकुंडातून उत्पन्न झाला. त्याचे नाव भावनारायण. त्याने पुढे त्या राक्षसाचा व त्याच्या कुलाचा नाश केला. हा भावनारायणच पुढे भावना ऋषी म्हणून लौकिक मिळवता झाला. या भावनारायणाने कमलपुष्पाच्या देठापासून तंतू काढून त्याचे तलम वस्त्र तयार केले व ते भगवान विष्णूला अर्पण केले, अशीही एक कथा आहे. त्यावरून त्यांनी हातमागावर वस्त्र विणण्याची कला विकसित केली, हे स्पष्ट होते व म्हणूनच ते या कलेचे प्रणेते मानले जातात. ती कला पुढे त्यांच्या वंशजांनी वाढवली. त्याच योगाने या कुलाचा विस्तार होत पद्मशाली समाज निर्माण झाला. ही सारी कथा प्रा. यंंगलवार यांनी या पुस्तकात दिली आहे. पद्मशाली समाजबांधवांसाठी या तीनही पुस्तकांचे संदर्भमूल्य निश्चितपणे फार मोठे आहे. पण सर्वच समाजासाठी ते मोठे वाचनीय व प्रेरणादायी आहे.पृ. 32 किं.30 रू.
वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी : प्रा. विजय यंगलवार / पृ. 32 किं.30 रू
मृत्युंजय मार्कंडेय ऋषी : प्रा. विजय यंगलवार / पृ. 122 किं. 120 रू.
महर्षी भृगु : प्रा. विजय यंगलवार / पृ. 62 किं. 60 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
Like this:
Be the first to like this post.
Posted in Uncategorized | 4 प्रतिक्रिया
तुमचा अभिप्राय नोंदवा
mala मृत्युंजय मार्कंडेय ऋषी : प्रा. विजय यंगलवार / पृ. 122 किं. 120 रू.he book pahije tevha te vpp ne pathavinyachi kripa karavi ,lobha asava.
all books are very good, informative.so pls send me the मृत्युंजय मार्कंडेय ऋषी : प्रा. विजय यंगलवार / पृ. 122 किं. 120 रू.book by vpp i will pay in the post.waiting for ur repply pls.
tumche gaon kaLavaa tethil vikretyacha phone no v patta kalavito.
tumche gaon kaLavaa tethil vikretyacha phone no v patta kalavito.